मुंबई (प्रतिनिधी) : ‘माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून, माझे संपूर्ण भाषण ऐकावे’, असे ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजप पुन्हा एकदा सत्तेत आला आहे, पण नवीन सरकारमध्ये देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात न आल्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. अशातच पंकजा मुंडे यांनी मंगळवारी एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देखील मला संपवू शकत नाहीत, असे विधान केले आणि त्यांची नाराजी उघड झाल्याचे बोलले जाऊ लागले.

पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाची लिंक ट्विटरवर शेअर करत हा खुलासा केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम केले. त्यात बुद्धिजीवी संमेलनमधील माझ्या भाषणाच्या हायलाईट्स. आपल्यापर्यंत एक ओळ आलीच आहे. ‘सनसनीखेज’ बातम्यांतून जमले तर हेही पाहा. मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे, असे ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी केले आहे.

नरेंद्र मोदी यांचे विश्वात एक वलय निर्माण झाले आहे. त्यामुळे आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. मोदींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादातून राजकारणात आले आहे; पण मोदींनी देखील मला संपवायचे ठरवले तरी ते मला संपवू शकत नाहीत, जर मी तुमच्या मनात असेन. त्यामुळे राजकारणात आपल्याला बदल करणे गरजेचे असल्याचेही पंकजा मुंडे यांनी या भाषणात म्हटले होते.