दिल्ली (वृत्तसंस्था) : महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज, नाव आणि चेहरा यांच्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा वापर त्यांच्या परवानगीशिवाय करू नये, असा अंतरिम आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने दूरसंचार मंत्रालयासह संबंधित विभागाला अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित गोष्टी हटवण्यास सांगितले. अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता की, त्यांच्या इंटेलक्चुअल प्रॉपर्टीचा त्यांच्या परवानगीशिवाय वापर केला जात आहे.

महानायकाने आपल्या याचिकेत आपले नाव, इमेज, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांना संरक्षण मिळावे, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. यामध्ये त्यांचे नाव, प्रतिमा, आवाज आणि वैयक्तिक वैशिष्ट्ये यांची परवानगी न घेता व्यावसायिक वापर करण्यास बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.

अमिताभ बच्चन यांनी बनावट कौन बनेगा करोडपती लॉटरी घोटाळ्यात त्यांची छायाचित्रे आणि आवाजाच्या वापराविरुद्ध त्यांच्या प्रसिद्धी अधिकारांचे संरक्षण मागितले होते. ते म्हणाले की, हे त्यांच्या सेलिब्रिटी स्टेटसच्या विरोधात आहे. अशा परिस्थितीत न्यायालयाने मनाई हुकूम जारी केला पाहिजे.

उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नवीन चावला म्हणाले की, प्रथमदर्शनी खटला अभिनेत्याच्या बाजूने जातो. हे कथित रीत्या बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. अभिनेत्याच्या परवानगीशिवाय त्यांचा सेलिब्रिटी स्टेटस वापरला जात आहे. या कृत्यांमुळे अभिनेत्याची बदनामी होत आहे.

ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी महानायकाच्या वतीने युक्तिवाद केला आणि सांगितले की, केबीसी लॉटरी नोंदणी आणि लॉटरी विजेते कैसे बने ही कौन बनेगा करोडपतीची नक्कल आहे. ही लॉटरी म्हणजे एक प्रकारचा घोटाळा आहे. कोणी पैसे जमा करत आहे. कोणीही जिंकत नाही. व्हिडिओ कॉलमध्ये अमिताभ बच्चन यांचा फोटो वापरला जात आहे. तुम्ही कॉल करता तेव्हा त्यांचा फोटो दिसतो. एक नकली आवाज आहे, जो अमिताभ बच्चन यांच्यासारखा वाटतो.