पाश्चिमात्य, दाक्षिणात्य वाद्यांच्या मिलापाचे सादरीकरण

0
14

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाश्चिमात्य वाद्य आणि दाक्षिणात्य वाद्य यांचा मिलाप साधणारे दुर्मीळ आणि पारंंपरिक वेगवेगळया वाद्यांचे सादरीकरण एकाच व्यासपीठावर सादर करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठ ५९ व्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्र तसेच संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षांत समारंभानंतर स्नातक विद्यार्थ्यांसाठी जागर दुर्मीळ वाद्यांचा व भावतरंग या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले.

यामध्ये ढोलकी, पखवाज, दिमडी, हलगी, धनगरी ढोल, संबळ या महाराष्ट्रीयन वाद्यांद्वारे लावणी, वाघ्या मुरळी, गोंधळ, नमन, दशावतार, गण-गवळण, पोवाडा यांचे उत्तम सादरीकरण करण्यात आले. थविल, मुरासु, उडुम्मई, इडम्मा, इदालम, मोडा मेलम, कोटटू मेलम, चेंडा, मृदंगम, गंजिरा, सिंगारी मेलम, थप्पू, पराई, पंवई ईसाई या दाक्षिणात्य वाद्यांद्वारे हरिनाम संकीर्तन, सलंगाई मेलम, देवी श्लोक, गणेश स्तुती यांचे संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी ऋषीकेश देशमाने व साथीदार यांनी केले. भावतरंग या गायनाच्या कार्यक्रमामध्ये लोकगीत, भावगीत, सिनेगीत, भक्तीगीत, प्रेमगीत, लावणी, द्वंदगीत यांचा बहारदार आणि मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम संगीत अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.

यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पोवार, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, संगीत अधिविभागप्रमुख डॉ. अंजली निगवेकर, डॉ. विनोद ठाकुर-देसाई, निखिल भगत, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, यांचेसह अधिकार मंडळाचे सदस्य, अधिविभागप्रमुख, विद्यार्थी उपस्थित होते.