जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्यास जनआंदोलन

0
496

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकाभिमुख प्रशासकीय कामकाज करणारे आणि कर्तव्यदक्ष अशी ख्याती असलेले जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मुदतपूर्व अचानक बदली केल्यास व्यापक जनआंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या  ई – मेलव्दारे दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी देसाई यांच्या बदलीसंदर्भात बातमी पसरताच विविध स्तरातून तीव्र नाराजीचा सूर उमटला. मुदतपूर्व बदली झाल्यास व्यापक जनआंदोलन करण्याचीही तयारीही विविध संस्था, संघटना, शेतकरी संघटनांनी केले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, दीड वर्षात जिल्हाधिकारी देसाई यांनी अतिशय प्रभावीपणे काम करीत आहेत. महाप्रलयंकारी महापूर, त्यानंतरचा कोरोना कालावधीमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. जिल्हाधिकारी देसाई यांनी मरगळलेले प्रशासन गतिमान केले. महसूलमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सातत्याने आग्रही राहत आहेत. दरम्यान, त्यांनी चांगल्या केलेल्या कामाचे बक्षीस की काय मुदतपूर्व बदली करण्याच्या हालचाली केल्या जात आहेत, का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाच सहा किलोमीटर दुर्गम भागात पायपीट करुन लोकांपर्यंत पोहचून ते सुविधा देण्याचे काम करीत आहेत. अशा अधिकाऱ्यानी यापेक्षा आणखी काय केले पाहिजे. त्यांचा कार्यकाल शिल्लक असताना बदलीसाठी प्रयत्न करण्यामागचे गौडबंगाल काय? राजकीय नेत्यांना कोल्हापुरच्या विकासासाठी चांगले अधिकारी ठेवायचेच नाहीत का ? जिल्हाधिकारी देसाई यांची त्यांचा कोल्हापुरातील कार्यकाल पूर्ण होईपर्यंत बदली करु नये. अन्यथा देश स्वतंत्र झाल्यावर सुध्दा इंग्रज राजवटीप्रमाणे हुकूमशाही महाराष्ट्रात चालू आहे, असा समज होईल.

कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत सुर्यवंशी, संभाजीराव जगदाळे, विनोद डुणूंग, चंद्रकांत पाटील, अंजूम देसाई, दादा लाड, अँड. रणजित गावडे, भरत रसाळे, राजेश वरक यांनी निवेदन पाठवले आहे.