कळे (प्रतिनिधी) : गरीब व वंचितांविषयी एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मनात आत्मीयता असेल तर असेल तर सामान्यांच्या विकासाची कवाडे उघडायला वेळ लागत नाही. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कांडरवाडी तलावानजीक असलेल्या दुर्गम भागातील वानरमारे वस्तीवर पायी जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. प्रत्यक्ष जिल्ह्यातील सर्वांत मोठा वरिष्ठ सरकारी अधिकारी आपली विचारपूस करायला, आपल्या अडचणी समजून घ्यायला आलेला बघून वानरमारे वस्तीतील लोकांचे मन भरून आले. आपसूकच सर्वांच्या तोंडून ‘‘जिल्लादिकारी सायब, तुमी देवमानूस हायसा बगा…’’ असे उद्गार बाहेर पडले.

बुधवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी कच्च्या रस्त्यावरुन धुरळा उडवत कांडरवाडीतून तलावाच्या दिशेने गेली. गाड्यांचा ताफा तलाव्याजवळ थांबला. पुढे रस्ता नसल्याने खाचखळगे, दगड-धोंडे व डोंगरातून गेलेली पायवाट. जिल्हाधिकारी दौलत देसाई व त्यांचे सोबत असलेले प्रांताधिकारी अमित माळी, पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे गाडीतुन उतरले. जिल्हाधिकारी देसाई यांनी ‘चला वस्तीवर’ असं म्हणत पायवाटेवरुन जाण्यास सुरुवात केली. सुमारे अडीच किलोमीटरची डोंगरातील चढउताराची पायवाट तुडवत वानरमारी वस्तीजवळ गेले. दगडावर अंथरलेल्या साध्या चटईवर बसून वस्तीवरील सर्वांची आपुलकीने विचारपूस केली.

पोटाची आग विझवण्यासाठी ना रोजगार, ना पसाभर जागा,  फुटकी भांडी, दांडे तुटलेले कप,  कुटीला अडकवलेली कापडी घाटोळे आणि तीन दगडाची चूल… हा त्यांचा संसार पाहून व त्यांच्या रोजच्या जगण्याचा संघर्ष ऐकून जिल्हाधिकारी गहिवरुन गेले. त्यांच्या मागण्या काय आहेत, याबाबत सविस्तर चर्चा केली. लवकरच तुम्हाला न्याय देऊ, अशी ग्वाही दिल्यावर वानरमारे मंडळींचे हृदय भरून आले.

सद्गदित स्वरांत ‘‘सायेब, पोटापान्यासाटी फिरन्यात आयुक्ष सपलं बगा… आमच्या पोराबाळाचं कल्याण करा. भूक विझवण्यासाठी आमच्या हक्काचा पसाभर जागा द्या. किती दीस ढोरावानी जगायचं ? आमच्यापातुर यिऊन आमच्यासंगं झोपडीत बसलात. खरंच सायेब, तुमी देवमानूस हायसा. आमचं तुमी नक्कीच भलं करणार, अशी आशा हाय’’ अशी भावना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली.

या वेळी नायब तहसीलदार विनय कौलवकर, मंडल अधिकारी बी. एस. खोत,  सुभाष सावंत,  माजी सरपंच दता पाटील आदी उपस्थित होते.