कोल्हापूर (प्रतिनिधी) : एका महिलेच्या नावे विद्युत ठेकेदारीचा परवाना मुंबई येथील कार्यालयातून मिळवून देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या  शिपायाला अटक करण्यात आली. अरविंद मधुकर लबदे (वय ४३, रा. माने कॉलनी, तामगाव, ता. करवीर) असे अटक केलेल्या शिपायाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (सोमवार) सायंकाळी ही कारवाई भवानी मंडप येथील पागा बिल्डिंगमध्ये विद्युत निरीक्षक कार्यालयमध्ये केली.

कोल्हापुरातील तक्रारदार व्यक्तीच्या पत्नीच्या नावे विद्युत ठेकेदारीचा परवाना घ्यायचा होता. त्यासाठी त्या व्यक्तीने भवानी मंडप येथील पागा बिल्डींगमध्ये असणाऱ्या विद्युत निरीक्षक कार्यालयामध्ये अर्ज दाखल केला होता. हा परवाना मुंबई येथील कार्यालयातून मिळवून देण्यासाठी कोल्हापुरातील विद्युत निरीक्षक कार्यालयातील शिपाई अरविंद लबदे याने त्या व्यक्तीकडे १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, त्या व्यक्तीने अरविंद लबदे याच्याविरोधात कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार लाचलुचपत विभागाने आज सायंकाळी कार्यालयामध्ये सापळा रचला होता. त्यावेळी तक्रारदार व्यक्तीकडून तेरा हजारांची लाच घेताना शिपाई अरविंद लबदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.