बोरपाडळे परिसरात शांततेत मतदान…

0
161

बोरपाडळे (प्रतिनिधी) :  बोरपाडळे परिसरातील सातवे,सावर्डे,आरळे गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) सकाळी साडे सात वाजल्यापासून दिवसभर अत्यंत चुरशीने आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावरती गर्दी केल्याचे दिसून येत होते.

सकाळच्या सत्रातच मतदान उरकून घेण्याकडे मतदारांचा कल दिसून आला. केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदारांना प्रोत्साहित  करून घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करून जास्तीत जास्त  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावन्याकरिता कार्यकर्त्यांची लगबग दिसून येत होती. अठरा वर्षाच्या मतदानापासून शंभरी पार केलेल्या मतदारांनी देखील उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये आरळे ९० टक्के, आवळी ८०,सावर्डे ८३,सातवे ८३, पैजारवाडी ८५, नावली ९५, सातवे ८३, जेऊर ८९, देवाळे ८९ टक्के असे परिसरामधील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इर्षेने मतदान झाले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

तसेच पन्हाळा तालुक्यातील आरळे येथे दुपारी एकच्या दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाचीचा प्रकार घडल्याने थोडावेळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी सतर्कता बाळगत कार्यकर्त्यांना मतदान केंद्राजवळून बाजूला काढल्याने पुन्हा मतदान प्रक्रियेला वेग आला. यावेळी कोडोली पोलीस ठाण्याने  चोख बंदोबस्त ठेवला होता.