कोल्हापूर (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील परतूर येथील लुई ब्रेल शिक्षण संस्थेतर्फे दरवर्षी व्यक्ती किंवा संस्थेला लुई ब्रेल पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदा हा पुरस्कार कोल्हापुरातील ‘दिव्यदृष्टीच्या’ अनुजा नेटके यांना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष शंकरराव राखुंडे यांनी केली.

राखुंडे यांनी सांगितले की, दरवर्षी चार जानेवारीला अंधांसाठी ‘ब्रेल लिपी’ विकसित करणाऱ्या लुई ब्रेल यांची जयंती साजरी केली जाते. यानिमित्त आमच्या संस्थेतर्फे विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या अंध व्यक्तीस तसेच अंधांसाठी तळमळीने कार्यरत असणाऱ्या एका व्यक्तीला किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. यंदा औरंगाबाद येथील अंध खेळाडू निकेत दलाल व कोल्हापुरातील दिव्यदृष्टी लेसर्सच्या अनुजा नेटके यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण फेब्रुवारी महिन्यात केले जाणार असल्याचे राखुंडे यांनी सांगितले.