कोल्हापूर (प्रतिनिधी) :   अंधश्रद्धेवर आधारित ‘परीस’ ही सस्पेन्स थ्रीलर वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतातील बराचसा प्रदेश ग्रामीण असून या भागात आजही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा दिसून येते. अशा या सामाजिक, ज्वलंत आणि महत्वाच्या विषयावर  ‘प्लॅनेट मराठी’ने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. 

भारतात अंधश्रद्धेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून त्यासाठी अनेकदा माणसांचा, जनावरांचा प्रसंगी जन्मजात बाळाचाही  बळी देण्याची विकृत कृत्ये केली जातात. याविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने या वेबसिरीजची निवड करण्यात आली आहे. असे ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले.

सोन्याच्या लोभापोटी गावातील काही लोक परीसाच्या शोधात निघतात. त्यांचा हा शोध त्यांना कुठपर्यंत घेऊन जातो ? त्यांना परीस मिळवण्यात यश येतं का ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना ३१ ऑगस्टला आपल्याला मिळणार आहेत.  या वेबसीरिजचे संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन मयूर करंबळकर, कुलदीप दंगाडे आणि विशाल सांगले यांनी केले आहे.