कुरुंदवाड (प्रतिनिधी) : तीन विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत (२५ टक्के) २०२३-२४ या वर्षात टाकवडे (ता. शिरोळ) येथील श्री बालाजी पब्लिक स्कूलमध्ये मिळाला असताना ५८ हजार रुपये फी भरल्याशिवाय प्रवेश निश्चित केले जाणार नसल्याचे स्कूलकडून सांगण्यात येत असल्याने संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत थेट शिक्षणसंचालकांकडे तक्रार केली आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा अविनाश चव्हाण, नईम चौगुले व पांडुरंग माने या पालकांनी दिला आहे.
शिक्षण संचालक तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील शिक्षण अधिकारी याकडे लक्ष देणार काय? गरीब तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो. यात तालुक्यातील ३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यानंतर गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती शिरोळ यांच्यामार्फत प्रवेश घेण्यासाठी पाल्यांची कागदपत्रे पडताळणी करून घेऊन बालाजी पब्लिक स्कूल यांच्याकडे अंतिम प्रवेश घेण्यासाठी कागदपत्रे जमा करण्यात आली होती; परंतु ५८ हजार रुपये फी (वाहतूक वगळता) भरल्याशिवाय प्रवेश निश्चित केला जाणार नसल्याचे स्कूलकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या शिक्षणांतर्गत आरटीईमधून प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होणार आहे. त्यामुळे तत्काळ मोफत प्रवेश द्यावा, अन्यथा अमरण उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे.
यावर अविनाश चव्हाण राहणार नांदणी, नईम चौगले (रा. गौरवाड), अजित माने (रा. तेरवाड) यांच्या सह्या आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी लेखी पत्र काढून तत्काळ या स्कूलबाबत चौकशी करून आवाहल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिरोळच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करून याबाबतचा आहवाल तत्काळ देण्याचा आदेश बालाजी स्कूलला देण्यात आला असल्याचे समजते. याबाबत बालाजी स्कूलचे प्राचार्य आणि संस्थेचे पदाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही.