जळगाव  : भाजपच्या नेत्या ‘पंकजा मुंडे यांना लवकरच मोठी जबाबदारी पक्षश्रेष्ठी देणार आहेत, अशी माहिती भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते जळगाव येथे माध्यमांशी बोलत होते. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही, त्यानंतर पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती, त्यावर हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

गिरीश महाजन म्हणाले, पंकजा मुंडे अजिबात नाराज नाहीत. त्यांच्या कामाची पक्षश्रेष्ठी दखल घेतली जात आहे. त्यांनी मला अभिनंदनासाठी फोनही केला होता. त्या नाराज आहेत असे हॅमर करु नये, तसे चित्र लोकांसमोर जात आहे. पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामाची दखल घेत यापेक्षा चांगले पद देतील.

ओबीसी नेत्यांना डावलण्याचे प्रकार सुरु असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसेंनी जळगावात केले होते. त्यांच्या या आरोपाला मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील आणि मी स्वतः ओबीसी आहोत. तुम्ही म्हणजे संपूर्ण ओबीसी असे समजण्याचे काही एक कारण नाही. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय केला हा आरोप पूर्णतः चुकीचा असल्याचे म्हणत खडसेंवर महाजनांनी जोरदार निशाणा साधला आहे.