रंकाळ्यावरचा पाणीपुरीवाला कोल्हापूरकरांना पाजतोय स्वच्छतागृहाचे पाणी : नागरिकांनी गाडा विस्कटला (व्हिडिओ)

0
380

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रंकाळा चौपाटी म्हणजे कोल्हापूरचं वैभव… रंकाळ्यावर येणारे अनेकजण तेथील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर आपल्या जिभेचे चोचले पुरवत असतात. मात्र, एक पाणीपुरी स्टॉलधारक नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार एका जागरूक कोल्हापूरकराने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपला. हा व्हिडिओ शहरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यातूनच संतापलेल्या काहीजणांनी आज (शुक्रवार) सायंकाळी त्या स्टॉलची मोडतोड केली.

हा पाणीपुरी स्टॉलधारक स्त्रियांच्या स्वच्छतागृहासाठी बसवलेल्या टाकीचे पाणी ग्राहकांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या पिपात ओततानाचा व्हिडिओ आज कोल्हापुरात खूपच व्हायरल झाला. अगदी ग्रामीण भागातही पसरला. सोशल मिडीयावर त्याबद्दल मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होऊ लागला. या किळसवाण्या कृत्याबद्दल त्याला धडा शिकवावा अशी मागणीही होऊ लागली. त्यातूनच आज संध्याकाळी काहीजणांनी या स्टॉलधारकाच्या साहित्याची मोडतोड केली.

वास्तविक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्याविषयी काळजी घेतली जात आहे. मात्र, रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या स्टॉलधारकांकडून कोणत्याच प्रकारची काळजी न घेता नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा संतापजनक प्रयत्न होत आहेत. आता महापालिकेचा आरोग्य विभाग अशा बेपर्वा स्टॉलधारकांवर कारवाई करणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.