पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेचा ‘पर्यावरण स्नेही बाप्पा’ उपक्रम…

0
38

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा नगरपरिषदेमार्फत पर्यावरण स्नेही बाप्पा या उपक्रमातंर्गत घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम कुंड तयार करण्यात आले होते. ते शहरातील प्रत्येक गल्लीमधून फिरवण्यात आले. या उपक्रमाला शहरातील नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला.

यावेळी शहरातील गणेश मंडळांकरीता नगरपरिषदेमार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या अंतर्गत बाप्पांची शाडूची मूर्ती, पर्यावरण पूरक सजावट, प्लास्टिक आणि थर्मोकॉलचा शून्य वापर, कोव्हीड अंतर्गत उपाययोजना अशा विविध निकषांच्या आधारे स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये श्री बालाजी क्रीडा मंडळ यांचा प्रथम क्रमांक, मृत्युंजय ग्रुपचा द्वितीय क्रमांक आणि श्री दत्त तरुण मंडळाचा तिसरा क्रमांक आला आहे. मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी शहरातील नागरिक आणि तरुण मंडळाचे या अभिनव उपक्रमास उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी नगराध्यक्षा रुपाली धडेल, नगरसेवक दिनकर भोपळे, फिरोज मुजावर, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, मंदार नायकवडी, राहुल भोसले नगरपरिषदेचे अमित माने, अंशुमन गायकवाड, नंदकुमार कांबळे आदी उपस्थित होते.