पन्हाळा (प्रतिनिधी) : कृषी विधेयकाला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ पन्हाळा तालुका भाजपातर्फे होळी आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये ऐतिहासिक कृषीविषयक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडविणारे पाऊल उचलले आहे.

या नवीन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखंडातून मुक्त होऊन आपल्या कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाला विक्री आणि बाजारपेठेचे स्वातंत्र मिळणार आहे. आपला शेतीमाल कुठेही  आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र मिळणार आहे. या ऐतिहासिक कृषीविषयक विधेयकाला देशातील सर्व राज्यांनी मंजूरी दिली. परंतु महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने याला स्थगिती दिली आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज (बुधवार) पन्हाळा तहसीलदार कार्यालय पन्हाळा येथे भारतीय जनता पार्टी पन्हाळा तालुक्याच्या वतीने होळी आंदोलन भाजपा तालुका अध्यक्ष सचिन शिपुगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

सदर आंदोलनात भाजपा युवा मोर्चाचे पन्हाळा तालुकाध्यक्ष दिग्विजय पाटील, तालुका सरचिटणीस अविनाश चरणकर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश देशमुख, अमर लुपणे, चिटणीस संजय सावंत, पन्हाळा शहराअध्यक्ष अमरसिंह भोसले, संदिप गवळी, युवा जिल्हा उपाध्यक्ष रवीराज गाताडे, अरूण माने, हरिदास उपाध्ये, तालुका वैद्यकीय आघाडी संतोष ठाकरे, तालुका ओबीसी आघाडी शिवाजी पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.