पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला

0
50

मुंबई (प्रतिनिधी) : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून  दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (सोमवार) दुपारी केली. त्यामुळे भाजपचे समाधान आवताडे यांच्याशी भगीरथ यांची अटीतटीची लढत होणार आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी  १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे.  जयंत पाटील यांनी ट्वीट करून भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा केली.  शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा!, असे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजपने समाधान आवताडे यांनी उमेदवारी दिली आहे. ते बांधकाम व्यावसायिक असून गेल्या ५ वर्षांपासून भाजपमध्ये काम करत आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत समाधान आवताडे आणि भगीरथ भालके यांच्या मध्येच चुरशीचा सामना रंगणार आहे.