पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी  राष्ट्रवादी आणि भाजपने जोरदार तयारी केली आहे. या दोन पक्षांमध्येच अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. भाजपकडून समाधान आवताडे तर राष्ट्रवादीकडून भगिरथ भालके रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, प्रचाराला वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक दावा करून भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी परिचारक, आवताडे गटाची युती आमच्यासाठी आव्हान नाही. कारण परिचारक आणि आवताडे गटाचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. ते पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये भांडण लावण्याचे काम करू नये. महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची स्वप्न चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्यांना दररोज पडत आहेत.   मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादीसह घटक पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेत आहेत, असेही ते म्हणाले.