कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंचगंगा नदीची पातळी काल (बुधवार) सकाळी आठ वाजता २८ फुटांवर होती. दुपारी चार पर्यंत ३३ फुटांवर, तर सायंकाळी सात वाजता ३५ फुटांवर पोहोचली होती. त्यामुळे तासाला पाऊण फुटाने वाढ होत गेली. गुरुवारी जिल्ह्यातील एकुण ७७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

गगनबावड्यासह राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. नद्यांच्या पातळीत वेगाने वाढ होत असून, पंचगंगेचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पातळी ३३ फुटांपर्यत पोहोचली असून रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने नदीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. एक राज्य आणि दोन प्रमुख जिल्हा मार्ग बंद असून ३९ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दरम्यान, पंचगंगेची पातळी यंदा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. सायंकाळी सातपर्यंत ३३ फुटांवर पातळी पोहोचल्यामुळे इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. ‘वारणा’ धरणाच्या साठ्यात दिवसभरात ३ टीएमसीने वाढ झाली. सध्या हे धरण ७१ टक्के भरले आहे. ‘राधानगरी’तून प्रतिसेकंद १४२५, तर ‘वारणा’ मधून १७१५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातच पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज, गुरुवारीही जिल्ह्यात धुवाधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज (गुरुवार) जिल्ह्यातील ८१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३८ फुटांपर्यंत गेली आहे. एक फूट पाणी वाढल्यास (३९ फूट) पंचगंगा नदी इशारा पातळी गाठणार आहे. तर ४३ फूट पाणी पातळी धोक्याची समजली जाते. जिल्ह्यातील एकुण ८१ बंधारे पाण्याखाली आले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील निळे-कारूंगले पूलावर पाणी आले आहे. त्यामुळे निळे, कारूंगले, मलकापूर येथील वाहतूक बंद झाली आहे. खोची दुधगाव बंधारा पाण्याखाली गेला असुन या मार्गे सांगलीला जाणारी वाहतुक बंद आहे. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षतर्फे देण्यात आली आहे.