कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर महामार्गावर गांधीनगर पोलिसांनी गाडीचा पाठलाग करत उचगाव हद्दीत टेम्पोसह ३३ लाख ४४ हजार १६८ रुपयांचा पानमसाला व सुगंधी तंबाखू आज (रविवार) जप्त केला. यामध्ये टेम्पोचालक जमीर हरूण पटेल (वय ३८, बैल बाजार रोड, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास गुटख्याची पोती घेवून टेम्पो क्र. (एमएच ५०-एन १७०९) महामार्गावरुन कागलहुन कराडकडे जात असल्याची माहिती गांधीनगर पोलिस ठाण्याचे सपोनि. सत्यराज घुले यांना मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांचे पथक नियुक्त करून या टेम्पोची माहिती दिली. या पथकाने पाळत ठेवून उचगाव येथे सापळा रचला. यावळी उचगाव महामार्गावर खणीजवळच्या पेट्रोल पंपानजीक टेम्पोचा पथकाने पाठलाग करुन मुद्देमाल ताब्यात घेतला. यामध्ये २१ लाख ४४ हजार १६८ रुपयांचा पानमसाला, सुगंधी तंबाखूची पोती आणि १२ लाखांचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई पोलिस हवालदार मोहन गवळी, आकाश पाटील, आयुब शेख, विराज डांगे, चेतन बोंगाळे, दिगंबर सुतार, सुभाष सुदर्शनी यांच्या पथकाने केली आहे. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.