मुंबई (प्रतिनिधी) : प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्याविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव आज (सोमवार) सादर केला. यावेळी त्यांनी आपल्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा दावा फेटाळून लावला.

मुंबईत आल्यानंतर तोंड फोडण्याची गोष्ट करणाऱ्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले, असे ट्विट करून अभिनेत्री कंगना रणौतने खळबळ उडवून दिली होती. तिच्या या ट्विटच्या आधारे प्रसारमाध्यमांतून बातम्या झळकल्या होत्या. यावरच सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.

ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घरी काय सापडले याची माहिती दिलेली नाही.  ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची संपूर्ण देशभरात बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. अभिनेत्री कंगना रणौत यांनी माझ्याविरोधात खोटे ट्विट केल्याने  कंगना तसंच त्याबद्दल बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्याविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे, असे प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.