दुबई (वृत्तसंस्था) : भारताविरुद्ध सतत कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानला मात्र, यावेळी नरमाईची भूमिका घ्यावी लागली आहे. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेबाबत पाकिस्तानने आपल्या जर्सीवरील स्पर्धेच्या लोगोखाली असलेले भारताचे नाव काढून टाकले होते. परंतु, बीसीसीआयच्या कडक भूमिकेपुढे त्यांनी नमते घेत भारताच्या नावासह नवीन जर्सी ‘लाँच’ केली आहे.

संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद बीसीसीआयकडे आहे. नियमांनुसार, आयसीसी स्पर्धेतील सर्व संघांना त्यांच्या जर्सीवर उजव्या बाजूला स्पर्धेच्या लोगोखाली यजमान देशाचे नाव आणि वर्षासह स्पर्धेचे नाव लिहिणे अनिवार्य आहे. परंतु पाकिस्तान संघाने जर्सीवर लोगोखाली भारताऐवजी यूएईचे नाव टाकून आपला भारतद्वेष दाखवून दिला होता. परंतु, भारताने आयसीसीमार्फत पाकिस्तानला स्पर्धेतून बाद करण्याचा इशारा दिल्यानंतर  पाकिस्तानने नवी जर्सी ‘लाँच’ केली. त्यामुळे इच्छा नसताना पाकिस्तानच्या खेळाडूंना ‘इंडिया’ लिहिलेली जर्सी घालूनच मैदानात उतरावे लागणार आहे. तर २४ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत – पाक लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.