नागपूर (प्रतिनिधी) : वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एका मिनिटात एक हजार कोटी रुपये दिले जातात. मग वीजबिल माफीचा निर्णय का घेतला जात नाही ? असा सवाल बावनकुळे यांनी केला.

बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर सडकून टीका केली. ते म्हणाले, वीज बिलाच्या मुद्द्यावर हे सरकार खोटं बोलत आहे. सरकारने १०० युनिट वीज माफीचे आश्वासन दिले होते. दिलेले आश्वासन या सरकारने पाळले नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प होते. तरीही सरासरी बिल दिली. ऊर्जामंत्री नितीन राऊतही हतबल आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या फायली फेकून देत आहेत. सामाजिक चळवळीतून आलेल्या राऊत यांचे नाव खराब करण्याचे काम हे सरकार करत आहे. वीजबिल माफीसाठी ५००० कोटी रुपये लागतील. पण सरकार पैसे देण्यास तयार नाही. अनिल परब यांच्या परिवहन खात्याला कामगारांच्या पगारासाठी एक हजार कोटींची गरज होती. त्यांना तात्काळ पैसे देण्यात आले. मग वीजबिल माफीचा निर्णय का घेतला जात नाही ?

आम्ही पाच वर्षात शेतकऱ्याचं एकही कनेक्शन कापले नाही. उलट आम्ही विदर्भात सात लाख वीज कनेक्शन दिले. या सरकारच्या काळात अनेक अवैध धंदे वाढले आहेत. रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी वाढली आहे. नागपूर, भंडारा आणि यवतमाळवरून रेट ठरवून दारूची तस्करी वाढली आहे. सरकारच्या काळातील या धंद्यावर प्रकाश टाकला तर बिघडले कुठे?