लिम्रास ट्रस्टने  केलेल्या ऑक्सिजन पुरवठयामुळे अनेकांना जीवनदान : हाजी इकबाल देसाई

0
44

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. बहुतांशी रुग्णांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासाठी हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील लिम्रास ट्रस्टतर्फे कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले, जयसिंगपूर आदी गावांमध्ये २२१ हून अधिक रुग्णांना मोफत जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला आहे. यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असल्याचे ट्रस्टचे  प्रमुख हाजी इकबाल देसाई यांनी सांगितले.

देसाई म्हणाले की, पेशंट डिस्चार्ज आणि होम कॉरोनटाईन झाल्यावर डॉक्टरांच्या सल्यानुसार पेशंटला ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केला जातो. या ट्रस्टतर्फे विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये गरजवतांना मदतीचा हात दिला आहे. याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड आणि त्यांचे संगोपनही केले जात आहे. प्रत्येक जाती-धर्माच्या माणसांमध्ये मानवता धर्म महत्वाचा आहे.

अशा महामारीच्या प्रसंगात माणूस जगला पाहिजे या एकाच उदात्त हेतूने आम्ही गरजूंना मोफत ऑक्सिजन देण्याचा निर्णय घेतला. ज्यांचे प्राण वाचले त्यांनी दिलेले आशिर्वाद फार महत्वाचे आहेत. यापुढेही प्रत्येक आपतीमध्ये गरजूंना मदत करण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे असणार असल्याचे सांगितले.