चेन्नई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेऊन चेन्नईत ऑक्सिजनसंबंधी संशोधन करणाऱ्या डॉ. भालचंद्र काकडे या संशोधकाचा ऑक्सिजन अभावीच तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात उच्चशिक्षण घेतल्यानंतर ते संशोधनाचे काम करत होते. ऑक्सिजन, हायड्रोजन वायूंपासून इंधनपूरक ऊर्जा निर्माण करून त्यावर रेल्वेही धावू शकेल, असे संशोधन त्यांनी सुरू केले. यापाठोपाठ त्यांनी सात पेटंटही मिळविली होती. पण, ऑक्सिजनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका चांगल्या संशोधकाला अखेरच्या क्षणी ऑक्सिजन मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या ४४ वर्षीय डॉ. काकडे यांना कोरोनाने गाठल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉ. काकडे हे चेन्नई येथे एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तब्येत बिघडत गेली आणि त्यांना ऑक्सिजनची गरज लागली. मात्र, अखेरपर्यंत त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही. ऑक्सिजन मिळवण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रचंड धडपड केल्याचे सांगण्यात येत आहे, पण सर्व व्यर्थ झाले. कमी वयात चांगली कामगिरी करणारा संशोधक गमावल्यानं कोल्हापूरसह राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. काकडे आणि त्यांच्या पत्नी चेन्नईतील एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत होते. तेथील प्रयोगशाळेमध्ये काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काकड यांनीही संसर्ग झाल्याचे जाणवल्यानंतर आपली कोरोना चाचणी करून घेतली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार सुरू झाले. काही दिवसांनी त्यांना श्वसनाला त्रास होऊ लागला. त्यांच्या विद्यार्थ्यांनी शासकीय कोरोना केंद्रात त्यांना दाखल केलं. मात्र, तेथे त्यांना नीट उपचार मिळाले नाहीत, ऑक्सिजनची कमतरता भासत राहिली. ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या संशोधकालाच ऑक्सिजनअभावी तडफडावे लागले.