कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडहिंग्लज उप जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात १०० बेड क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर बसवण्याची सोय करण्यात येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (सोमवारी) सांगितले.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयातील आयसीयू आणि ऑक्सिजन बेडच्या नियोजनासंबंधी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, भविष्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढवण्याची शक्यता गृहित धरुन आरोग्य विभागाने नियोजन करावे. गावागावात तपासणी शिबीर घ्यावे. स्वॅब घेण्यासाठी फिरत्या वाहनांची सोय करावी. जेणेकरुन लवकर तपासणी आणि उपचार करणे शक्य होईल. एचआरसीटी(HRCT) तपासणीचा अहवालही एकत्ररित्या आला पाहिजे. त्यानुसार आरोग्य विभागाने नियोजन करावे. इली, सारीच्या रुग्णांना तपासणीसाठी संदर्भित करावे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आयजीएम रुग्णालय, संजय घोडावत विद्यापीठ, गडहिंग्लज उप जिल्हा रुग्णालय येथील आयसीयू, ऑक्सिजनेटेड बेडचे कामकाज, ऑक्सिजन पुरवठा कामकाज याबाबत सविस्तर आढावा घेतला.

यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, मुख्य लेखा तसेच वित्त अधिकारी संजय राजमाने, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार आदी उपस्थित होते.