कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे १ हजार ५० कोटीहून अधिक रकमेचे नुकसान झाले असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. अतिवृष्टीमुळे विविध मार्गाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून आगामी काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रात पंचमाने सुरु आहेत. जिल्ह्यातील पूरबाधितांना सानुग्रह अनुदानासाठी आगाऊ मदत म्हणून शासनाकडून १७ कोटी ४२ लाख ५ हजार इतका निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात ७१ हजार २८९ इतकी पूरबाधित कुटुंबसंख्या असून त्यापैकी ६१ हजार ८६४ इतक्या जणांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अतिवृष्टीमुळे ५ हजार ७८९ घरांची अंशता तर १ हजार १०७ घरांची पूर्ण पडझड झाली आहे. त्यापैकी अनुक्रमे ५ हजार १०३ व ८०९ इतके पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील २ हजार ४६६ गोठा पडझडी पैकी केवळ ६४६ पंचनामे शिल्लक राहिले आहेत. तर १२ हजार १५७ दुकानधारकांपैकी सुमारे ९ हजार ६७५ जणांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसला असून पुरामुळे ५८ हजार ९९७ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ७ व्यक्ती मृत झाल्या होत्या. शासकीय निकषानुसार ६ मृत व्यक्ती आर्थिक मदतीसाठी पात्र असून या मृत्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये सानुग्रह देण्यात आले आहे. तर १ मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत मदत देण्यासंदर्भातील प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर केला आहे. या आपत्तीमध्ये १६१ जनावरे मयत झाली असून १३ कुटुंबातील सुमारे १५ हजार १७८ इतक्या पोल्ट्री पक्षांचा पंचनामा पूर्ण झाला आहे.

हस्तकला, हातमाग, क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या १ हजार १६९ कारागीरांपैकी ९४१ जणांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.