वातावरणातील बदलामुळे कोल्हापुरात साथीच्या आजारामध्ये वाढ…

0
269
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन या साथीच्या आजारामध्ये वाढ झाली असून हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी पहावयास मिळत आहे. एकीकडं कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडं साथीच्या आजारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अचानक थंडी बंद होऊन कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. तर हवेत उष्णता वाढल्याने लोकांचा थंड पेय, पदार्थ खाण्याकडे कल वाढला असून तेच साथीच्या आजाराला खतपाणी घालत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे कितीही उष्णता  वाढली असली तरी थंड पेय, पदार्थ न घेता साधं पाणी पिणे आपल्या आरोग्याला पोषक ठरणार आहे.

एकीकडं कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे वातावरण बदलामुळे साथीच्या आजारात भर पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. कारण सर्दी, खोकला, ताप म्हटलं की कोरोना असे समीकरण झाले असून अशा रुग्णांची तपासणी केली असता बहुधा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येतो असेही म्हटलं जातं. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम असून खबरदारी म्हणून नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

वातावरणातील बदलामुळे लोक थंड पेयांना पसंती देत आहेत. त्यामुळे साथीच्या आजारात वाढ होत असून वातावरणात कितीही उष्णता असली तरी साधंच पाणी प्यावे. थंड पेय, पदार्थ टाळणे आवश्यक आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले पाहिजेत.

                                                                                                     – डॉ. प्रसाद देसाई                                                                                                               (शाहूपुरी, कोल्हापूर) 

साथीचे आजार टाळण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या…

हवेत उष्णता वाढली तरी थंड पेय, पदार्थांचे सेवन टाळावे.

योग्य प्रमाणात झोप, पौष्टिक आहार घ्यावा.

बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.

त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझरच्या वापरासह सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करणे आवश्यक.