सर्वसामान्य जनतेच्या मनातील आपला आमदार म्हणजेच चंद्रकांत जाधव (अण्णा)…

0
729

कोल्हापुर (प्रतिनिधी) : उत्कृष्ट फुटबॉलपट्टू, यशस्वी उद्योजक, प्रत्येक गरजवंताच्या मदतीला धावून जाणारे मदतगार, सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आदर्श सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूर शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन सामाजिक, शैक्षणिक,कला, क्रीडा, संस्कृतिक, उद्योग, आरोग्य अशा विविध क्षेत्रात अल्पावधीत आमदार चंद्रकांत जाधव यांनी आपला ठसा उमटवला आहे. शहरातील विकासाचा अंधकार आमदार जाधव यांच्या विकास ज्योतीने कमी होण्यास मदतच झाली आहे. यामुळेच सर्वसामान्य जनतेच्या मनातील आपला आमदार म्हणून त्याची प्रतिमा तयार झाली आहे.

शतकी परंपरा लाभलेला कोल्हापूरचा फुटबॉल आणि येथील जगावेगळे फुटबॉलप्रेमी प्रसिद्ध आहेत. राजकारणातही फुटबॉलपटूंचा मोठा वावर राहिलेला आहे. अनेक फुटबॉलपटूंनी महापालिकेच्या नगरसेवक व महापौर पदांची धुरा सांभाळली आहे.  फुटबॉलपटूंच्या या परंपरेत चंद्रकांत जाधव यांचा आवाज थेट विधानसभेत पोहोचला आणि आमदार म्हणून शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. फौंड्री कामगार ते फौंड्री मालक आणि फुटबॉलपटू ते आमदार हा प्रवास आश्चर्यकारक, आश्वासक व कौतुकास्पद आहे. एक उद्योजक आमदार जनतेचे प्रश्न काय समजणार, अशी टीकाही त्यांच्यावर विरोधकांनी केली.  मात्र, विरोधकांच्या प्रत्येक टीकेला अण्णांनी आपल्या कामातून उत्तर दिले. राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित असावे आणि त्यानंतर लोकप्रतिनिधीने संपूर्ण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे, असे अण्णांचे ठाम मत होते.

यामुळेच गट-तट,  पक्ष-पार्टी, जात-धर्म या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आमदार साहेब काम करतात. याचा परिणाम म्हणजे अण्णांकडे काम घेऊन आलेला माणूस कधीही रिकाम्या हाताने परत गेला नाही. अण्णांकडे आलेल्या प्रत्येकाचे काम झालेच पाहिजेच म्हणून त्यांनी पणाला लावलेली ताकद ही त्यांच्या लोकप्रतिनिधीत्वाची जाणीव करून देते. आण्णा एक यशस्वी उद्योजक होते. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य वाखाणण्याजोगे होते. या व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावरच मतदार संघातील प्रत्येक घटनेकडे, विकासकामाकडे आणि जनतेच्या समस्यांकडे ते बारकाईने लक्ष ठेवायचे.

पहाटेपासूनच त्यांच्या नित्यक्रमाला सुरुवात होत होती. खेळाडू असल्यामुळे ते ट्रॅकसुटवरच बाहेर पडून थेट ग्राउंडवर जाऊन नागरिकांची गाऱ्हानी ऐकून घेत. त्यामुळे अनेकजण सकाळी फिरण्याच्या वेळात समस्या सांगायला येत होते आणि अण्णा त्या समस्या तत्काळ सोडवायचे. आमदार जाधव यांच्या शब्दसंग्रहात कंटाळा, आळस, नाराजी, करूया की, बघूया की,  पाहुया की,  नंतर पाहू, वेळ नाही असल्या फालतू शब्दांना अजिबात थाराच नाही. आमदार साहेब कुठेही असोत, मोबाईलवर हमखास भेटणारच. एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत फोन घेता नाही आला तर नंतर स्वतः फोन करून संबंधित व्यक्तीचे काम मार्गी लावायचे.

राजकरणात जे शक्य नाही. ते करून दाखवण्याचा लोकप्रिय मार्ग आमदारांनी पत्करला नाही. जे काम आपल्याकडूनच होते ते आवर्जून करावे आणि जे होत नाही ते स्पष्टपणे सांगण्याचे धाडस आमदार साहेबांनी नेहमीच दाखवलेले आहे. शहराच्या विकासाला दिशा देणारे सर्वसामान्यांची कामे मार्गी लावणारी, प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी झटणारी, आणि विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारे आमदार चंद्रकांत जाधव म्हणजे सर्वसामान्यांचे जनमाणसांचे आमदार आज सर्वाना अचानक सोडून गेले आहेत. त्यांच्या अचानक जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य आहे.

‘लाईव्ह मराठी’ परिवारातर्फे आ. चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली…