पाटणा (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोलने वर्तविला अंदाज धुळीस मिळवत बिहारी जनतेने चौथ्यांदा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हातात सत्ता सोपविली. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून सर्वाधिक जागा घेतल्या असल्यातरी तेजस्वी यादव यांच्या राजदला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. तर भाजपची ‘बी’ टीम म्हणून टीका झालेल्या  लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल  समाधानकारक आले आहेत. या निवडणुकीत आपलं मिशन फत्ते झाले आहे.  आम्ही लक्ष्य ठेवले होते, त्याप्रमाणे ते साध्य झाले आहे. या निवडणुकीत भाजपची कामगिरी चांगली राहावी, असे वाटत होते आणि तसेच झाले आहे. मात्र, आम्हाला जेडीयूला झटका द्यायचा होता. तो आम्ही दिला आहे. अर्ध्याहून अधिक जागांवर त्यांचे नुकसान झाले आहे. आमची देखील जास्त जागा जिंकायची इच्छा होती. मात्र, त्यात आमची थोडी चूक झाली. वडिलांच्या तब्येतीमुळे प्रचाराकडे थोडे दुर्लक्ष झाल्याने आम्हाला अपेक्षित यश मिळवता आले नाही.