मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास : अर्णब गोस्वामीला अटक करतील

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगतापांचे पोलीस आयुक्तांना निवेदन   

0
127

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलिसांच्या कामाच्या पद्धतीची आम्हाला चांगली माहिती आहे, त्यामुळे योग्य ती कारवाई करुन पोलीस रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब  गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे.

अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यांमध्ये अर्णब यांच्याविरोधात निवेदन देण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. अर्णब गोस्वामींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, आम्ही पोलीस आयुक्तांबरोबर सविस्तर चर्चा केली आहे. या प्रकरणावर कायदेशीर सल्ला घेऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला पोलीस आयुक्तांनी दिले आहे, असे भाई जगताप यांनी सांगितले.