…अन्यथा महापालिकेविरोधात आंदोलन सुरू करू : आखरी रास्ता कृती समिती

0
119

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील रखडलेल्या गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्याचे काम त्वरित सुरू करा, अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू करण्यात येईल. आणि त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे सहाय्यक आयुक्त नितीन देसाई यांना देण्यात आले. यावर टेंडरच्या कामाची पूर्तता झाली असून आठ दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन देसाई यांनी शिष्टमंडळाला दिले.

निवेदनात म्हटले आहे की, रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल आखरी रस्ता कृती समितीच्या वतीने वारंवार आंदोलनात्मक लढा उभारला आहे. त्यानंतर प्रशासनाने रेंगाळलेले ड्रेनेज काम त्वरित करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्यापही या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. पोलीस प्रशासनाने मध्यंतरी हा मार्ग काही काळ एकेरी केला होता पण महापालिकेकडून कामाची पूर्तता होत नसल्याने तो पूर्ववत केला आहे. त्यामुळे शुक्रवार पेठ ते पंचगंगा नदी मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. हा रस्ता लवकर होऊ नये, यासाठी प्रयत्नशील असणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ? असा सवाल करण्यात आला आहे.  यावेळी किशोर घाटगे, राकेश पाटील, रियाज बागवान, सनी अतिग्रे, सुरेश कदम, महेश कामत, राजवर्धन यादव, जयश्री चव्हाण-पाटील आदी उपस्थित होते.