अन्यथा गोकुळच्या कारभारासंदर्भात सर्व पुराव्यांसह जनतेसमोर जावं लागेल :  शौमिका महाडिक

0
979

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  गडमुडशिंगी येथील २ दूध संस्थांचे दूध संकलन गोकुळ कडून अचानक रद्द केल्यामुळे दूध उत्पादकांनी संघाच्या संकलन अधिकाऱ्यास चांगलेच धारेवर धरले होते. याच मुद्यावर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी फेसबूकद्वारे आपले म्हणणे मांडले. आज सत्ताधाऱ्यांकडून दूध उत्पादकांना विविध निर्णयांच्या माध्यमातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालू असून या संदर्भात संघाच्या आगामी बैठकीत सत्ताधाऱ्यांकडून याची उत्तरे अपेक्षित आहेत. ती न दिल्यास मला सर्व पुरावे घेऊन जनतेसमोर जावं लागेल, असा इशारा सौ. महाडिक यांनी दिलाय.

शौमिका महाडिक यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये पुढील प्रमाणे उल्लेख केला आहे. गडमुडशिंगी येथील दूध संस्थांबाबत घडलेला सर्व प्रकार वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्याला समजला असेलच. सर्वप्रथम मी त्या दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींचं अभिनंदन करते, की त्यांनी आवाज उठवून लढा देण्याचं धाडस दाखवलं. अशा इतरही काही संस्था आहेत ज्यांच्यावर अश्याच प्रकारे अन्याय झाला आहे. तेही हळूहळू समोर येतील अशी अपेक्षा आहे. पण मी आज ज्यासाठी लिहिते आहे, त्याचं कारण वेगळं आहे.

फक्त दगड-विटांच्या चार भिंती नव्हे, तर लाखो लोकांचे कष्ट, त्यांचे आशीर्वाद आणि विश्वास म्हणजे सहकार असतो. याचा विसर कदाचित गोकुळ दूध संघाच्या सत्ताधाऱ्यांना पडला आहे. आजकाल संघामध्ये सर्रास मनमानी कारभार आणि सत्तेचा दुरुपयोग केला जातो आहे. साधारण 18 तारखेला मला माहिती मिळाली की, गोकुळ दूध संघामध्ये अनधिकृतपणे काही निर्णय घेतले गेले आहेत आणि हे निर्णय घेताना सहकाराचे कसलेही नियम पाळले गेले नाहीत.

१९ जानेवारी रोजी मी स्वतः संघात जाऊन सर्व गोष्टींची पडताळणी केली. संचालक या नात्याने संबंधित विषयाची माहितीही अधिकाऱ्यांकडे मागितली. तेव्हा काही माहिती उपलब्धच नाही व जी उपलब्ध आहे ती चेअरमन साहेबांना विचारल्याशिवाय देऊ शकत नाही, अशा पद्धतीची उत्तरे मला मिळालं.  तरीही मी संयम ठेऊन चेअरमन साहेबांना भेटून विचारणा केली असता उद्या सकाळपर्यंत तुमच्याकडे माहिती द्यायला सांगतो, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा मी मेलद्वारे व लेखी पत्राद्वारेही संघाकडे माहिती मागवली, मात्र सत्ताधारी व प्रशासन यांच्याकडून मागील तीन ते चार दिवस फक्त टाळाटाळ सुरू आहे. मी अजूनही शांतपणे उत्तराची प्रतीक्षा करते आहे.

आता मंगळवार दिनांक २५ जानेवारी रोजी संघाची संचालक मंडळाची बैठक आहे. मी अपेक्षा करते की, त्या मिटिंगच्या आधी किंवा मिटिंगमध्ये मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तसेच सत्ताधाऱ्यांनी घेतलेला काळा निर्णय माघारी घेऊन सहकार कायद्यानुसार सर्व प्रक्रिया त्यांच्याकडून पार पाडली जाईल. अन्यथा असलेल्या सर्व पुराव्यांसह त्याच दिवशी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन मला जनतेसमोर जावं लागेल. आणि मग तिथेच या प्रकरणाबाबतची माझी पुढील भूमिका मी स्पष्ट करेन.

फेसबुक लिंक पुढीलप्रमाणे….

https://www.facebook.com/106002534369805/posts/464296395207082/