गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गोडसाखर कारखाना सुरू करण्याचा निर्णय शेतकरी हितासाठी घेतला आहे. पण चांगला चालत असलेला कारखाना निव्वल राजकारणासाठी आणि खासगी कंपनीच्या घशात घालण्यासाठी ही धडपड सुरू आहे. या कारखान्यासाठी आणि शेतकरी हितासाठी शासनाने यात तातडीने लक्ष घालून मार्ग काढावा, अन्यथा शेतकरी व कर्मचारी अडचणीत येवून त्यांच्या कुटुंबाची राख  रांगोळी होईल, अशी भीती महेश कोरी यांनी व्यक्त केली.

कोरी पुढे म्हणाले की, कारखाना सुरू करताना कोणीही विरोध केला नाही. एक सभासद या नात्याने कारखाना चांगला चालावा, या हेतूने चेअरमन श्रीपतराव शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी माझ्याकडून आणि बाकी लोकांकडून २५ लाख रुपये कारखान्याला मदत केली. हा कारखाना चांगला चालावा म्हणून चेअरमन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वच पातळीवर शेतकरी आणि सभासद यांनी हा कारखाना चालविण्याचा विडा उचलला.

आज रोजी कारखान्यामध्ये ६० हजार क्विंटल साखर तयार आहे. तर कोटीच्या घरात मोल्यासिस देखील तयार आहे. हे जर वेळेत विक्री झाले, तर कारखाना खूप चांगला चालेल आणि फायद्यात देखील येईल. सर्वच स्तरातून कारखाना चालविण्यासाठी धडपड सुरू असताना सर्व पक्षीय संचालकांनी ही भूमिका का घेतली ? सुरुवातीपासून काही न बोलता आता कारखाना सुस्थितीत चालणार ही कल्पना आल्याने त्यांनी हा पवित्रा घेतला आहे. त्यांच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे.

अशा अडचणीच्या काळात कोणाच्या तरी घशात कारखाना खासगी तत्वावर घालण्याचा आता यांचा डाव आहे. तो कदापिही येथील शेतकरी आणि सभासद होऊन देणार नाही. जर कारखाना नुकसानीत जात असेल, तर स्वतःची प्रॉपर्टी देखील लिहून द्यायला तयार आहे. जर कोणी राजकारण करून कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर मी माझ्या जिवाची पर्वादेखील करणार नाही, असा इशारा कोरी यांनी दिला आहे.