कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गावभाग शिये गावाला महापुराचा मोठा फटका बसतो. इथे जवळपास ६५० कुटुंबे पूरबाधित आहेत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन गायरानामध्ये करण्यात यावे. तसेच बेकायदेशीरपणे उत्खनन करणाऱ्या नागरिकांसह, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. अन्यथा १५ ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करु देणार नसल्याचा इशारा रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिला.

अॅड. शिंदे म्हणाले की, शिये गावात आलेल्या पुरामुळे नागरिकांची प्रचंड नुकसान झाले आहे. इथल्या नागरिकांच सर्व्हे नं.२५९ व २८३ गायरानमध्ये करण्यात यावे. तसेच याठिकाणी करण्यात आलेले बेकायदेशीर अतिक्रमण काढावे. गायरानामधील उत्खनन करणाऱ्या नागरिकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. यासाठी संघटनेने  वारंवार आंदोलन करण्यात आली.

मात्र, याची दखल न घेतल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करण्यास अटकाव करणार असल्याचे यावेळी अँड. शिंदे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला उत्तम पाटील, धनाजी चौगले, बाबासो गोसावी, के.बी. खुटाळे, देवदास लाडगांवकर, परशुराम शिंदे उपस्थित होते.