कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे मराठा जातीचा दाखला देण्याचे काम स्थगित करण्यात आले आहे. मराठा आर्थिक आर्थिक दुर्बल घटक दाखले देण्यात यावेत, अन्यथा तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आज (सोमवार) सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन सकल मराठा समाजामार्फत मेलद्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रत ८५टक्के स्टेट कोट्यामध्ये सीईबीसीसाठी पात्र झालेले बांधवांना आज जरुरी असलेले State EWS सर्टिफिकेट मिळत नाही. तरी शासनाने त्वरित दाखले देण्याचे आदेश पारीत करावेत. राज्य शासनाने परवाच्या मंत्रीमंडळ बैठकीत आरक्षण स्थगितीनंतर विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये, म्हणून मराठा समाजाला अनेक योजना, निधीसह जाहीर केल्या आहेत. यामध्ये पहिली योजना स्थगित काळात आर्थिक दुर्बल (ईडब्लूएस) दाखले मराठा समाजासाठी देण्यात येतील. यासंदर्भात सकल मराठा समाजाने आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. की मराठा आरक्षण हे आमचे हक्काचे व महत्वाचे असून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती लवकरात लवकर उठवून, मराठा आरक्षण लागू करावे. याबाबतीत अजिबात तडजोड केली जाणार नाही. परतूं सध्या तरी  मेडिकल व इतर प्रवेशासाठी केंद्रीय, राज्य कोटा प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण स्थगितीमुळे नुकसान होवून वर्ष वाया जाऊ नये, म्हणून मराठा आर्थिक दुर्बल घटक दाखले काढणे क्रमप्राप्त झाले आहे. अशावेळी मंत्रीमंडळ निर्णय होवून व आरक्षण नसलेल्यांना ईडब्लूएस दाखला देणे कायदेशीर आहे. मराठा समाजाची दाखल्याबाबत अडवणूक होत आहे. ही बाब खच्चीकरण व चीड आणणारी आहे. ईडब्लूएस दाखले त्वरित देण्यात यावेत, अन्यथा वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेबरोबरच अन्य सर्वच प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात याव्यात. तरी दोन दिवसांत ईडब्लूएस आर्थिक दुर्बल घटक दाखले मराठ्यांना देण्याचे आदेश त्वरित द्यावेत. अन्यथा १२ तालूक्यातील तहसील कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

निवेदनावर वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, संदीप देसाई, शाहीर दिलीप सावंत, शशिकांत पाटील, संजय जाधव, धनंजय सावंत, दिगंबर फराकटे, मयूर पाटील, दिगंबर साळुंखे, सुशील भांदिगरे, विकास जाधव, संग्रामसिंह निंबाळकर, प्रताप नाईक, अवधूत पाटील सह्या आहेत.