कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेचा २५४ कोटींचा घरफाळा थकविणाऱ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करून चौकात डिजिटल बोर्ड लावावेत. घरफाळा घोटाळ्यातील संबंधित दोषींवर कारवाई करावी. घरफाळा आकारणीची नवीन संगणक प्रणाली अंमलात आणावी, यासह इतर मागण्यांवर येत्या १५ दिवसात सकारात्मक विचार करून खुलासा करावा, अन्यथा जनआंदोलन छेडू, असा इशारा शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे सहाय्यक आयुक्त नितीन देसाई यांना दिले.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने २५४ कोटी रुपयांची घरफाळ्याची थकबाकी जाहीर केली आहे, ती कधीपासूनची आहे?, गेल्या कित्येक वर्षात घरफाळा विभागाचे ऑडीट का झालेले नाही ?ऑडिट झाले असेल तर थकबाकीची गोष्ट का निदर्शनास आली नाही ?, गेली कित्येक वर्ष महापालिकेच्या वतीने भोगवटाधारक घरफाळा बिले वाटप बंद केले याची कारणे काय ? यामुळे थकीत असलेल्या रकमेला जबाबदार कोण ? त्याचबरोबर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घरफाळा घोटयाळयाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर राज्य शासनाने आपल्या महापालिकेशी काही संपर्क केला आहे काय ? या सर्व प्रश्नांचा जाहीर खुलासा करावा. अन्यथा महापालिकाविरोधात जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, अंजुम देसाई, चंद्रकांत सूर्यवंशी, संभाजीराव जगदाळे, चंद्रकांत पाटील, विनोद डुंणूग, राजू मालेकर, श्रीकांत भोसले, रणजित पवार, कादर मलबारी यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.