शिरोली (प्रतिनिधी) : शिरोली येथे महावितरण कंपनीकडून थकबाकीदार वीज ग्राहकांकडून चुकीच्या पद्धतीने वीज बिल वसुली करीत आहेत. यामुळे शिवसेना शिरोली शाखेच्यावतीने शिवसैनिकांनी सहाय्यक अभियंता मणेर आणि कर्मचारी यांना धारेवर धरले. ग्राहकांकडून टप्प्याटप्प्याने रक्कम भरून घ्यावी, कोणाचेही वीज कनेक्शन तोडू नये अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा दिला.

शिरोली पुलाची येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी थकबाकीदारांकडून सक्तीची वसुली केली सुरु केली आहे. थकबाकी वसुलीसाठी कनेक्शन तोडताना घरातील महिलांनाही वेठीस  धरण्याचे प्रकार कर्मचाऱ्यांकडून केले जात आहेत. एका घरात वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याकडे गृहिणीने काही रक्कम भरण्याची तयारी दर्शवली आणि  कनेक्शन न  तोडण्याची विनंती केली. मात्र, या कर्मचाऱ्याने संपूर्ण रक्कम भरा किंवा उर्वरित रकमेचा पुढील तारखेचा चेक द्या असे सांगितले. या महिलेने आपले चेकबुक नसल्याचे सांगितल्यावर दुसऱ्या कोणाचाही चेक आणून द्या नाहीतर वीज कनेक्शन तोडणार असे सुनावले.

हा प्रकार ग्रामस्थांना समजल्यानंतर शिरोली शिवसेनेचे शहर प्रमुख राजकुमार पाटील तसेच नेते अनिल खवरे, युवा सेनेचे मुकुंद काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता मणेर यांना जाब विचारला. याबाबत मणेर यांनी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कारवाई सुरू असल्याचे सांगितले. तेव्हा शिवसैनिकांनी आदेशाची प्रत दाखवण्याची मागणी केली. आणि ग्राहकांकडून जमेल तशी टप्प्याटप्प्याने रक्कम भरून घ्या, कोणाचेही वीज कनेक्शन तोडू नका अन्यथा शिवसेना स्टाईल हिसका दाखवून कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा दिला.

सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, तलाठी निलेश चौगुले यांनी समन्वयाने  काम करा असे सांगितले. यावेळी उपशहर प्रमुख अशोक खोत, माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, प्रल्हाद खोत, उत्तम पाटील, आनंद दरेकर, अमर चौगुले, सुनील जाधव, युनूस शेख, वासिम पटेल, जावेद कोतवाल, इस्माईल मुल्ला, शाहिद कोतवाल, यूनुस मुल्ला, सुरेश राठोड उपस्थित होते.