…नाहीतर शरद पवारांची जीभ घसरली असेल : राम शिंदे

0
76

अहमदनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणात, लोकशाहीत अर्धशतक पूर्ण करणारे नेते आहेत. त्यांच्या तोंडातून जे वाक्य गेले ते अनावधानाने गेले असेल किंवा त्यांची जीभ घसरली असेल, असे म्हणत भाजप नेते व माजी मंत्री राम शिंदे यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

जेजुरी गडावर येथे अहिल्यादेवी होळकर यांचा पुण्यश्लोक पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर राम शिंदे यांनी टीका केली आहे.

अहिल्याबाईंचा जन्म राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये झाला आहे, असे विधान शरद पवार यांनी केले होते. या विधानाचा शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. अहिल्यादेवी होळकर यांचा असा नामोल्लेख करणे ही गंभीर चूक असून हा अवमान आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे शरद पवार यांच्याआधी अनावरण केले. यावेळी त्यांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका केली होती. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पडळकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.