…अन्यथा कारखान्याच्या गेटमधून एकही वाहन सोडणार नाही : शेतकरी संघटना

0
119

 कोतोली (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांची शेअर्स रक्कम व्याजासह परत मिळावी. चालू हंगामात उसाला प्रति टन चार हजार रुपये दर मिळावा यासाठी आज (बुधवार) दालमिया शुगर कारखान्याला शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. जर तोडगा नाही निघाला तर कारखान्यांमध्ये उसाचे कांड येऊ देणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

पन्हाळा तालुक्यातील दत्त आसुर्ले पोर्ले साखर कारखाना जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपले कर्ज फेडण्यासाठी दालमिया शुगर कंपनीला १०९ कोटी रूपयाला विकला. पण यामध्ये बँकेने आपले कर्ज फेडून घेतले व शेतकऱ्यांची सभासद रक्कम मात्र अद्याप देण्यात आलेली नाही. ही रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना मिळावी व चालू हंगामातील उसाला प्रति टन चार हजार रुपये दर मिळावा. अन्यथा कारखाना गेटवरून एकही उसाचे वाहन कारखान्यात येऊ देणार नाही. असा इशारा शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी दिला आहे. तर संबंधित प्रशासनाने वेळीच तोडगा न काढल्यास जिल्हा बँक व दालमिया शुगर वर न्यायालयात दाद मागणार असून याबाबत वकिलाशी चर्चा करण्यात आली आहे अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली.

यावेळी सुनील गोटखिंडे, डॉ. बी. एम. पाटील, ज्ञानदेव पाटील, अशोक पाटील, सदाशिव जाधव, संभाजी साळुंखे, जयसिंग पाटील, पदाधिकारी उपस्थित होते.