जळगाव (प्रतिनिधी) : एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. जामनेरमध्ये जी. एम. फाऊंडेशनच्या ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते. या वेळी महाजन यांचे स्वीय सहायक दीपक तायडे यांना आलेल्या निनावी फोनवरून ही धमकी देण्यात आली. महाजन यांना एक कोटी रुपये द्यायला सांग, नाही तर त्यांना बॉम्बने उडवून देऊ, असे धमकावणाऱ्याने तायडेंना सांगितले.

खंडणीसाठी धमकावणाऱ्याने केवळ फोनच केला नाही तर त्याच फोनवर धमकावणारा मेसेजही पाठवला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक कोटी रुपये द्या नाही तर बॉम्ब ब्लास्ट करू, अशी धमकी या वेळी देण्यात आली होती, अशी माहिती तायडे यांनी दिली. धमकी देणारा हिंदीत बोलत होता, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.