रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळीमधील माळभाग आंबेडकरनगर येथील दलित वस्तीमध्ये रंगोली पार्टिकल बोर्डापासून सर्व घरांचे सांडपाणी आणि शेतीचे पाणी हे आंबेडकरनगर येथे येते. या सांडपाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी येथे गटर्स नाहीत. त्यामुळे परीसरात सांडपाणी साठून रहाते. यासाठी ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देऊन सुद्धा गटर्स केलेल्या नाहीत. या निवेनावर तात्काळ कारवाई न केल्यास २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा मोहन घोडके यांनी दिला आहे.

मोहन घोडके म्हणाले की, मी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विद्यमान सरपंचांच्या विरोधात निवडणूक लढविली आहे. यामुळे केवळ राजकीय द्वेषापोटी सरपंच याठिकाणी गटर करण्यास टाळाटाळ करीत आहेत.. सिद्धार्थनगर गावभाग व आंबेडकरनगर माळभाग परिसरात गटर्स तुबुंन सांडपाणी रस्त्यावर जात आहे. दोनशे ते तीनशे दलित कुटुंब येथे राहतात.तसेच गावठाण मध्ये ढोर समाजाचे एक कुटुंब असून ती ढोर वसाहत आहे असे दाखवून सरपंच आपल्या घराकडे जाणारा रस्ता करीत आहेत.

सरपंच दलित वस्ती सुधार योजनेतील फंडाचा दुरुपयोग करीत आहेत. हा फंड दलित वस्तीतील गटर्स करण्यासाठी करावा अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., कोल्हापूर गट विकास अधिकारी आणि हातकणंगले तहसिलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर तात्काळ कारवाई केली नाही तर लाक्षणिक उपोषणाचा इशारा मोहन घोडके यांनी दिला आहे.