कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील महिनाभरापासून भूलतज्ज्ञ नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून सीपीआर रुग्णालयातील बंद असलेल्या हदयरोग शस्त्रक्रिया दोन दिवसात सुरू करण्यात याव्यात, अन्यथा सीपीआर रुग्णालयातील अधिष्ठातांना काम करू देणार नसल्याचा इशारा आज (शनिवार) जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी दिला.

सीपीआर रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांचे आधारवड असून येथील हृदयरोग शस्त्रक्रिया गेल्या महिन्याभरापासून भूलतज्ज्ञ नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून बंद आहेत. त्यामुळे याच्या निषेधार्थ जाब विचारण्यासाठी आज जिल्हा शिवसेनेच्या वतीने सीपीआर रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. दरम्यान याप्रकरणी संताप व्यक्त करत डॉ. आरती घोरपडे यांना धारेवर धरण्यात आलं. या वेळी सोमवारपर्यंत हृदयरोग शस्त्रक्रिया सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करुन सीपीआरच्या अधिष्ठातांना काम करू देणार नसल्याचा इशारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

या वेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, शशिकांत बिडकर यांच्यासह जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.