नवी दिल्ली (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात महिनाभरापासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. आता शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ४ जानेवारीला होणाऱ्या  बैठकीत  शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक बोलणी न झाल्यास  हरयाणातील सर्व मॉल, पेट्रोल पंप बंद करू,  असा इशारा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकारसोबत  सोमवारी (दि.४) बैठक होणार आहे. या बैठकीबाबत शेतकरी संघटनांची एक बैठक झाली. त्यानंतर सिंधू सीमेवरील आंदोलनाच्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा देण्यात आला. यावेळी शेतकरी नेते गुरनाम सिंह म्हणाले की, केंद्र सरकारने चारा आणि वीज कायदा याबाबत  दोन मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु इतर मागण्या  मान्य केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. ६  जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर हरयाणा आणि राजस्थानच्या सीमेवर आंदोलन  करणारे शेतकरी दिल्लीत घुसतील ,  असा इशाराही  यावेळी देण्यात आला.