इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या इचलकरंजी शाखेत पेन्शन व विविध योजनेतील रक्कम काढून घेण्यासाठी येणाऱ्या दिव्यांग, महिला व वयस्कर मंडळींसाठी निवारा शेड, स्वच्छ पाणी यासह मूलभूत सुविधा नसल्याने त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबद्दल राष्ट्रवादी उद्योग व्यापार आघाडीच्या वतीने आज (शनिवार) शाखा व्यवस्थापक दिपक रावळ यांना जाब विचारुन धारेवर धरले. याबाबत पुढील आठ दिवसात योग्य कार्यवाही न केल्यास भीक मांगो आंदोलन करू, असा इशाराही दिला.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील शाखेत शासनाच्या विविध योजनांची रक्कम जमा होते. ही रक्कम काढण्यासाठी दिव्यांगांबरोबर महिला व वयस्कर लोक पहाटे सहा वाजल्यापासून रांग लावून बसलेले असतात. इथे पाणी, निवारा शेड व्यवस्था करण्याबाबत वारंवार शाखा व्यवस्थापनाकडे तक्रार करुन देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याबाबत आज (शनिवार) राष्ट्रवादी उद्योग व्यापार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सुभाष मालपाणी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बँकेत येऊन शाखा व्यवस्थापक दिपक रावळ यांना याचा चांगलाच जाब विचारला.

मालपाणी यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधून या गंभीर प्रकरणाची माहिती दिली. यावर त्यांनी तात्काळ संबंधित शाखा व्यवस्थापकास याबाबत सूचना देवून योग्य कार्यवाही करु, असे आश्वासन दिले. यानंतरही शाखा व्यवस्थापकाने राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला याबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. यामुळे  राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी संतप्त होत रावळ यांना धारेवर धरले.

यावेळी राष्ट्रवादी उद्योग व्यापार आघाडीचे इचलकरंजी शहराध्यक्ष सचिन भुते, रमेश पाटील, हुसेन मुजावर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.