कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील अनेक महिन्यांपासून गाजत असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा घोटाळ्याचे निष्पपातीपणे बाह्य संस्थेकडून ऑडिट करण्यात यावे, या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (शुक्रवार) आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर धनगरी ढोल वाजवून जोरदार निदर्शने  करण्यात आली.

याबाबतचे निवेदन सह.आयुक्त विनायक औंधकर यांना देऊन येत्या आठ ते दहा दिवसांत विश्वासू बाह्यसंस्थेकडून घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट करण्यात यावे, अन्यथा आयुक्त कार्यालयात ॲटम बॉम्ब फोडण्याचा इशारा आम आदमी पार्टीचे  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी यावेळी दिला. यावेळी घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट झालेच पाहिजे, घरफाळा घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासशाचा धिक्कार असो, अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनात ‘आप’चे जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, पल्लवी पाटील,  अश्विनी गुरव, इस्टर कांबळे, जयदीप सरनाईक, गिरीश पाटील, राज कोरगावकर, राकेश गायकवाड यांच्यासह आपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.