कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड येथील चिलखी विभागातील दत्त मंदिरला १०० वर्षे पूर्ण झाल्याने येथील दत्त मंदिरच्या वतीने यंदा शतकमहोत्सवी श्री दत्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दि. २९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरअखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शतकमहोत्सवी सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली.

कुरुंदवाड येथील चिलखी विभागातील दत्त जयंती शतकमहोत्सवी सोहळ्यानिमित्त दररोज सकाळी सहा वाजता आरती व पूजा, सकाळी सात वाजता गुरुचरित्र पारायण, दुपारी बारा वाजता आरती व नैवेद्य. मंगळवार. दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता ध्वजारोहण, कलश पूजन, दीप प्रज्वलन, ग्रंथपूजन दिगंबर शंकर पुजारी यांच्या हस्ते व सदाशिव जेरे पुजारी, संजय पुजारी, विनायक साळुंखे व राजू फल्ले यांच्या उपस्थितीत होणार आहे.

अभिषेक, पूजा, स्त्रोत पठण, मान्यवरांचे प्रवचन, विविध भजनी मंडळांचे भजन, भक्ती गीते, सुश्राव्य गायन व अभंगवाणी अभंगरंग व नाट्यभक्तीरंग, सोंगी भजनाचा बहारदार कार्यक्रम, बासरी वादन असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत होणार आहेत. मंगळवार, ६ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता श्री दत्त याग पूजा, सकाळी दहा वाजता श्री पादुका व मूर्तीची भव्य मिरवणूक, रात्री नऊ वाजता भजन (श्रीपंत बाल अवधूत भजनी मंडळ) असे कार्यक्रम होणार आहेत.

बुधवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्री दत्त पादुकावर सार्वजनिक अभिषेक, सायंकाळी पाच वाजता भजन दत्त मंदिर भजनी व गुरुमाऊली भजनी मंडळ, सायंकाळी सात वाजता दत्त महाराज जन्म सोहळा, रात्री नऊ वाजता भजन (शिरोळ तालुका भजन वेडे ग्रुप मंडळ), गुरुवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता भजन (दत्त भजनी मंडळ मांगूर), दुपारी बारा वाजता महाप्रसाद होणार आहे, अशी माहिती शतकमहोत्सवी सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली.