सशक्त लोकशाहीवर मीम स्पर्धेचे आयोजन

0
9

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मराठी मीम माँक्स यांच्या संयुक्त विद्यमाने सशक्त लोकशाही या संकल्पनेवर आधारित भव्य मीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धेत सहभाग नोंदवता येणार आहे.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ३००० आणि २००० रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येकी ५०० रुपयांची १० उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. मीम पाठवण्याची अंतिम तारीख २९ नोव्हेंबर आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फेसबुकवरील मराठी मीम  माँक्स हा ग्रुप जॉईन करणे आवश्यक आहे.

मतदार नोंदणी आणि मतदार जागरूकता, निवडणुका- लोकशाहीचा सोहळा आणि  लिंगभेदाच्या पलीकडे नेणारी मतदारांची लोकशाही हे तीन विषय मीम स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत. मीम स्पर्धेसाठी मराठी मीम माँक्स या फेसबुक पेजवर पोस्ट केलेलेच मीम ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक कार्यालयाने केले आहे.