कुंभोज (प्रतिनिधी) : शेतामधील मातीचे परीक्षण करून शेती करा. शेतीला आवश्यक असणाऱ्या सेंद्रिय खताचा तसेच इतर खतांचा पुरवठा करावा. शेजाऱ्याची शेती पाहून शेती न करता स्वतःच्या बुद्धीने शेती केली तर नक्की फायदेशीर ठरेल. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे, असे मत कृषी तज्ज्ञ प्रवीण माळी यांनी व्यक्त केले.

हर घर तिरंगा अभियानांतर्गत कुंभोज येथे पंचायत समितीच्या कृषी विभाग अंतर्गत सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील हे होते. कुंभोज येथे ग्रा.पं. व पं. स. यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभेश्वर सेवा सोसायटीमध्ये मॅनेजर जयेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर झाले.

शेतकऱ्यांनी ज्यादा उत्पादन न पाहता चांगल्या दर्जाचे उत्पादन देण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सेंद्रिय खताकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिल्यास नक्कीच उत्पादन वाढेल व खर्च कमी होईल, असे जयेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी प्रवीण माळी यांनी शास्त्रीय पद्धतीने सेंद्रिय शेती कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. सहायक गटविकास अधिकारी एस. बी. देशमुख, कृषी अधिकारी अभिजित घोरपडे, अमोल कुलकर्णी, नामदेव पाटील, एस. एस. शिंदे, ग्रा.पं. सदस्य विशाखा माळी, विक्रमसिंह सेवा सोसायटीचे चेअरमन श्रीकांत माळी, परस्पर सेवा सोसायटीचे चेअरमन जंबू भोकरे, कुंभेश्वर सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक चौगुले, ग्रा.पं. सदस्य भरत भोकरे, अशोक घाटगे, सुदर्शन चौगुले, राहुल कत्ते, रावसाहेब पाटील, कृषी सेवा केंद्राचे तालुका उपाध्यक्ष मदन आनुसे, आदी उपस्थित होते.