कपिलेश्वर (प्रतिनिधी) : बिद्री, ता. कागल येथील श्री दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ३० सप्टेंबरनंतर घेण्याचे आदेश कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी दिले आहेत. याबाबत शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. या कारखान्याची निवडणूक आता पावसाळ्यानंतरच होईल यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत १० ऑक्टोबर २०२२ रोजी संपली आहे. कारखान्याचे एकूण ६१ हजार ३८४ सभासद आहेत. यापैकी ६३१९ मयत सभासद वगळून ५५ हजार ६५ सभासदांची ‘अ’ वर्ग, तर संस्था गटातून १०२२ आणि ४ व्यक्ती सभासदांची ‘ब’ वर्गाची पक्की मतदार यादी साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे यांनी १७ मे रोजी प्रसिद्ध केली आहे.
कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी शक्यता असतानाच २४ मे रोजी राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही निवडणूक पावसाळ्यानंतर घेण्याची विनंती केली होती. या पत्रात त्यांनी बिद्रीच्या कार्यक्षेत्रात ७ जूनपासून पावसाला सुरुवात होते.
पावसाळ्यात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे महापूरसदृश परिस्थिती निर्माण होते. संपूर्णतः जनजीवन विस्कळीत होते. पावसाळ्यात या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम राबविणे सर्वांच्याच गैरसोयीचे आहे. त्यामुळे बिद्रीची निवडणूक पावसाळ्यानंतर म्हणजे ३० सप्टेंबरनंतर घ्यावी, असे म्हटले होते. सध्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे तिथेच थांबविण्यात आली आहे.
आबिटकर यांच्या या पत्राची दखल घेत कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी निवडणूक प्रक्रिया थांबविण्याची आणि ती ३० सप्टेंबरनंतर राबविण्याचा शासकीय आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता ही निवडणूक पावसाळ्यानंतरच होईल, हे स्पष्ट झाले आहे.