कुरुंदवाड (प्रतिनिधी) : व्यक्तिमत्त्व विकासात वक्तृत्व कलेला अत्यंत महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच याची जोपासना करावी, असे उद्गार कुरुंदवाडमधील सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालयाचे निवृत्त इतिहास विभागप्रमुख प्रा. एकनाथ करमळकर यांनी काढले.
येथील शिक्षण प्रसारक मंडळ व सीताबाई पटवर्धन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या आंतरशालेय कात्रे स्मृती वक्तृत्व स्पर्धेत अध्यक्षस्थानावरून प्रा. करमळकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांच्या पतसंस्थेचे व्हा. चेअरमन व ज्येष्ठ क्रीडाशिक्षक शरद तावदारे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रा. शरद पराडकर यांनी केले. प्रा. पराडकर यांच्या हस्ते प्रा. करळमकर व तावदारे यांचा सत्कार करण्यात आला. परीक्षक म्हणून कोरोची विद्यामंदिराच्या शिक्षिका सुरेखा कुंभार व उदगाव विद्यामंदिराच्या आरती लाटणे यांनी काम पाहिले.
याप्रसंगी तावदारे, कुंभार, लाटणे यांनी मनोगत व्यक्त केले. सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या शिक्षिका वहिदा पठाण यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सहायक शिक्षिका वंदना नरके यांनी केले. या यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व रोख पारितोषिके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वक्तृत्व स्पर्धेसाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी प्रथम क्रमांक : अनन्या प्रकाश जाधव (विठ्ठलदास गोसालिया हायस्कूल, माधवनगर सांगली), द्वितीय- : वेदिका मारुती भुजूगडे- (डॉ. सा. रे. पाटील हायस्कूल, जांभळी), तृतीय- : श्रेया सुनील पवार (जी. बा. पाटील हायस्कूल, चिपरी), उत्तेजनार्थ : श्रावणी विठ्ठल कोळी (न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, अब्दुललाट) व शुभम दादासाहेब पवार (सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड).