ह्या तर चोराच्या उलट्या… ! : गारगोटी ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांना विरोधकांचा टोला

0
105

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील गारगोटी ग्रामपंचायतीला कायमस्वरुपी ग्रामसेवक मिळावा म्हणून सुरु असलेल्या आंदोलनात सत्ताधारी मंडळींनी आम्हा विरोधी ग्रामपंचायत सदस्यांवर केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असंच म्हणावं लागेल, अशी प्रतिक्रिया विरोधी आघाडीच्या सदस्यांनी पत्रकात व्यक्त केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, गारगोटी ग्रामपंचायतीमध्ये सत्तेवर असणाऱ्या माजी आमदार के. पी. पाटील व माजी आमदार बजरंगआण्णा देसाई गटाच्या सत्ताधारी मंडळींच्या नियमबाह्य कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी येण्यास तयार नाहीत. सत्ताधारी मंडळींनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून बोगस बँक खाते काढून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केलेला आहे. तसेच नियमबाह्य पध्दतीने केलेली नोकर भरती, बांधकाम परवाने देण्यासाठी राजरोस लाखो रुपयांची मागणी करण्यात येत आहे. यामुळे गारगोटी शहरतील सर्वसामान्य नागरीक मेटाकुटीला आलेला आहे, हे सत्ताधारी गटाच्या नेतेमंडळींना शोभणारे नाही. याबाबत तालुका ग्रामसेवक संघटनेमार्फत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे गारगोटी ग्रामपंचायतीमध्ये काम न करण्याबाबत समक्ष भेटून सांगितले आहे. यावरुन ग्रामपंचायतीमध्ये कशा पध्दतीने कामकाज सुरू आहे हे निदर्शनास येत आहे. यास सर्वस्वी सत्ताधारी मंडळी जबाबदार असताना आमच्यावर आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच होत.